औरंगाबाद, दि.९ (सांजवार्ता ब्युरो) :
शहर
रोड रेड झोनमध्ये असून रुग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय
समितीने याची दखल घेत आज जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. शहरात
कोरोना संसर्गाची स्थिती वाढत चालली आहे. राज्यातील इतर शहरांच्या मानाने
औरंगाबादचा मृत्यू दर अधिक आहे. तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ लॉक डाऊन
ठेवूनही रुग्ण संख्या आटोक्यात न आल्याने केंद्र सरकारने या परिस्थितीची
दखल घेतली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या रेड झोन मधील
शहरांचा दौरा करण्यासाठी केंद्राने समिती नियुक्त केली आहे. संयुक्त सचिव
कुणाल कुमार हे या समितीचे प्रमुख आहेत. लवकरच ही समिती शहराचा दौरा करणार
असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा आढावा ही समिती
घेणार आहे.
*व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद*
दरम्यान
केंद्रीय समितीचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी आज दुपारी व्हिडिओ
कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार
पांडे, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले,
जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
संवाद साधला. यात शहरातील कोरोना संसर्गाची स्थिति, रुग्णसंख्या,
मृत्यूदर, कोविड सेंटर, खाजगी हॉस्पिटलमधील उपचार सुविधा, अलगीकरण व्यवस्था
त्याच बरोबर कंटेनमेंट झोनमधील उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली.
*समिती लवकरच औरंगाबादेत*
राज्यातील
रेड झोन मधील शहरांची स्थिती लवकरात लवकर सुधारावी यासाठी केंद्राने आता
हस्तक्षेप केला आहे. केंद्राने नियुक्त केलेली समिती लवकरच औरंगाबादचाही
दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी प्रशासनाला कोरोना
संसर्गाची संपूर्ण माहिती तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठवडाभरात
या समितीचा दौरा होऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.